पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय सुधारणा सांख्यिकी तांत्रिकी समितीची बैठक

पुणे, दि. २४: पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय सुधारणा सांख्यिकी तांत्रिकी समितीच्या बैठकीस सादर केलेली सांख्यिकी माहिती ही वैज्ञानिक, संस्था व पशुपालन क्षेत्रात काम करणारे तसेच धोरण, योजना ठरविणाऱ्याना उपयुक्त ठरेल. ही माहिती योग्य व वेळेत मिळाली पाहिजे, असे मत राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय स्तरावरील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय सुधारणा सांख्यिकी तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीचे उदघाटन श्री. सत्तार यांच्या हस्ते आज यशदा, पुणे येथे झाले. पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव महेश पाठक, आयुक्त ए.टी. कुंभार, केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विभागाचे आयुक्त डॉ. सुरेश एस. होनागोपाल, सांख्यिकी विभागाचे महासंचालक ए.के. मेहरा, अपर संचालक आशिष कुमार, यशदाचे उपसंचालक डॉ. के.एम. नागरगोजे उपस्थित होते.

DSC_2349__1_

श्री. सत्तार म्हणाले, “पशुधन विकास व अधिक उत्पादनासाठी पशुपालन विभाग अनेक योजना राबवित आहे. अनुवंशिक सुधार कार्यक्रमांतर्गत आधुनिक पशुप्रजनन धोरणानुसार दुध व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन वाढविण्यात या योजनांचे मोठे योगदान आहे. यातून लोकांना रोजगार मिळून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होत आहे. ग्रामीण लाभार्थ्यांसाठी ५० ते ७५ टक्के सबसिडी योजनांद्वारे दिली जाते. दुग्ध व दुग्धजन्य उत्पादनात वाढ होण्यासाठी व शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कामधेनु दत्तक योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. प्रमुख पशुधन उत्पादन, दुध अंडी, मांस व ऋतूनुसार तसेच वार्षिक उत्पादन वाढीसाठी योजना धोरण ठरविण्यासाठी योग्य सांख्यिकी माहिती वेळेत मिळणे महत्वाचे आहे. ही माहिती या सांख्यिकी  तांत्रिक सल्लागार समितीने द्यावी.” यावेळी, डॉ. सुरेश एस., आशिषकुमार, ए.के. मेहरा यांची भाषणे झाली. सचिव महेश पाठक यांनी प्रास्ताविक केले. सांख्यिकी सल्लागार ए.के. दास यांनी आभार मानले. यावेळी विविध राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त, संचालक उपस्थित होते.